मकर संक्रांती
श्री शके १९४७ ची मकर संक्रांती
बुधवार दि. १४ जानेवारी २०२६ म्हणजेच शके १९४७ पौष कृ. ११ रोजी दुपारी ३.०६ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
संक्रांतीचा पुण्यकाल
बुधवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी ३.०६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याने मकर संक्रमण बालव करणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाति आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनांव व नाक्षत्रनांव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त ३० आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे.
संक्रांतीचे फल
संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल.
पर्वकालात द्यावयाचे दान
नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत.
किंक्रांत
करिदिन गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी आहे.
संक्रांतीमध्ये वर्ज्य कर्मे
दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत.